दिनांक: २४/०७/२०२६
दरवर्षीप्रमाणे यंदाही आषाढी एकादशीच्या निमित्ताने ‘पालखी सोहळा’ अत्यंत भक्तिमय आणि उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या समृद्ध वारकरी संप्रदायाची, संस्कृतीची आणि मूल्यांची ओळख व्हावी, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.शाळेच्या प्रांगणात विठ्ठल-रुक्मिणीची सुंदर मूर्ती स्थापन करून पालखीची स्थापना करण्यात आली. शाळेचे मुख्याध्यापिका यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची पूजा व पालखीचे पूजन करण्यात आले.या सोहळ्यात सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. लहान मुलांनी वारकरी, टाळकरी आणि विठ्ठल-रुक्मिणीची वेशभूषा परिधान केली होती, तर मुलींनी पारंपरिक नऊवारी साडी नेसून डोक्यावर तुळशीवृंदावण घेतले होते.
शाळेच्या प्रांगणातून टाळ-मृदंगाच्या गजरात आणि "ज्ञानबा-तुकाराम" व "विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल" च्या जयघोषात पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. शाळेच्या १ ली ते ७ वी च्या प्रत्येक वर्गाने वेगवेगळ्ळे अभंग गायले.विद्यार्थ्यांनी या प्रसंगी पारंपरिक 'फुगडी' आणि 'अभंग' सादर केले. विद्यार्थ्यांच्या रिंगण सोहळ्याने उपस्थितांची मने जिंकून घेतली.
कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना आषाढी एकादशी व वारी परंपरेचे महत्त्व सांगून सर्व उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.मुख्याध्यापकांचे मार्गदर्शन, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा उत्साह यामुळे हा सोहळा अत्यंत भक्तिमय व बालवारकऱ्यांच्या आनंदाने न्हाऊन निघालेल्या वातावरणात पार पडला.