श्री कृष्णजन्माष्टमी व शिक्षकदिन

आनंदीबाई कर्वे प्राथमिक शाळा    12-Oct-2026
Total Views |
दिनांक: ०४/०९/२०२६
आपल्या शाळेत मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात 'श्रीकृष्ण जन्माष्टमी व शिक्षक दिन' यांचा संयुक्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम दुपारी १२:४५ ते १:४५ या वेळेत शाळेच्या 'नटभैरव हॉल' मध्ये पार पडला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून माजी मुख्याध्यापिका मा. सौ. विजया बराटे उपस्थित होत्या.कार्यक्रमप्रसंगी प्रमुख पाहुण्या,शाळेचे मुख्याध्यापक व उपस्थित शिक्षकांच्या हस्ते सरस्वती माता आणि भगवान श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले.दीपप्रज्वलनानंतर भक्तिमय वातावरणात बाळकृष्णाची भावपूर्ण आरती करण्यात आली. त्यानंतर बालकृष्णाची मूर्ती पाळण्यात ठेवून पाळणा पूजन करण्यात आले. शाळेतील विद्यार्थिनींनी मधुर आवाजात पाळण्याची गाणी सादर केली.
 
शिक्षक दिन व जन्माष्टमी या दोन्ही सणांचे औचित्य साधून दोन विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले,विद्यार्थ्यांनी 'शिक्षक दिना' चे महत्त्व स्पष्ट करत शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.प्रमुख पाहुण्या मा. सौ. विजया बराटे यांनी विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केले.
 
शाळेच्या मा. मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना शिक्षक दिन व जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आणि पाहुण्यांचे आभार मानले.यानंतर विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यामध्ये श्रीकृष्णाच्या बाललीलांवर आधारित नृत्य सादर करण्यात आले.कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षकांना गोपालकाल्याचा प्रसाद वाटण्यात आला.