गुरुपौर्णिमा

आनंदीबाई कर्वे प्राथमिक शाळा    12-Oct-2026
Total Views |
दिनांक: 29/07/2026
 
आपल्या संस्कृतीत गुरूचे स्थान अनन्यसाधारण आहे. याच आदराची व कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्यासाठी शाळेत गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण व भावूक वातावरणात पार पडला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्रीमती सुनंदा ताई देशमुख ह्या होत्या तर व्यासपीठावर मुख्य पाहुण्या म्हणून स्वाती शेंडे मॅडम उपस्थित होत्या.पाद्यपूजनाने कार्यक्रमाची सुरुवात.
 
कार्यक्रमाचा प्रारंभ मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने झाला. यानंतर गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांच्या माता-पालकांचे पाद्यपूजन करण्यात आले. लहानग्या विद्यार्थ्यांनी आपल्या आईचे पूजन करून त्यांचा आशीर्वाद घेतला, ज्यामुळे संपूर्ण वातावरण अत्यंत भावूक व स्नेहपूर्ण बनले होते.याप्रसंगी इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी गुरू-शिष्यांच्या विविध प्रेरणादायी आणि भावस्पर्शी गोष्टी सांगून उपस्थितांची मन जिंकली. प्राचीन काळातील गुरू-शिष्य परंपरेपासून ते आधुनिक काळातील गुरूंचे महत्त्व मुलांनी आपल्या सुंदर शब्दांतून मांडले.त्याचबरोबर महाराष्ट्र टॅलेंट सर्च (MTS) परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवून उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थिनींचा सन्मान करण्यात आला. प्रमुख पाहुण्या स्वाती शेंडे मॅडम यांच्या हस्ते गुणवंत मुलींना बक्षीस व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले.
 
स्वाती शेंडे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, "आई ही आपली पहिली गुरू असते आणि त्यानंतर शिक्षक आपल्याला घडवतात. विद्यार्थ्यांनी जिद्दीने व परिश्रमाने यश मिळवावे."
मुख्याध्यापकांचे मार्गदर्शन
शाळेच्या मुख्याध्यापकांनी उपस्थितांना संबोधित करताना गुरुपौर्णिमेचे महत्त्व अधोरेखित केले. "शिक्षणाचा पाया भक्कम करण्यात पालकांचा व शिक्षकांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असतो. पालकांनी आणि शिक्षकांनी एकत्र येऊन विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कार्य केले पाहिजे," असे प्रतिपादन त्यांनी आपल्या मार्गदर्शनात केले.तसेच सर्व शिक्षकांनी बनवलेल्या शैक्षणिक साहित्याचे प्रदर्शन पाहिले.कार्यक्रमाच्याशेवटी विद्यार्थ्यांनी आपल्या सर्व शिक्षकांना गुलाबपुष्प देऊन गुरुवंदना केली व संपूर्ण कार्यक्रम अतिशय नियोजनबद्ध रीतीने पार पडला.